Sunday 24 July 2016

गावची एशटी

                                  

लोका नाक्यार उभी रवान एशटीचो कानोसो घेत होती आजुन कशी गाडी ये ना नाय!
 पकल्याचे दोन ग्लास चाय पोटात रिजवन झाले. लालाच्या दुकानार येर-  - झारो घालून मंदीचं गाड्योचो कानोसो घेवक पकलो पिंपळाच्या झाडापर्यंत जाय .तितक्यात गाडयेची घरघर लांबसून तेच्या कानार इली. "इलीs s इलीs s गाडी इली", असा आरडतच तो स्टँडवर इलो. तो पर्यंत लांब थय लाल रंगाची एशटी नजरेक पडली. सगळ्यांका हायसा वाटला. इली एकदाची असा म्हणान जो तो आपल्या जवळचा सामान हातात घेवन एशटीत चढण्याच्या तयारीत सज्ज झालो.
कळकट - मळकट धुळीत माखलेली एशटी ऐटीत येवन थांबली.

     ती थांबाची खोटी , सगळे गाडयेत चडाक पुढे पुढे करूक लागले. कोणी खिडकेतसूनच रुमाल टाकून जागा अडवता, तर कोणी  हातातली पिशी टाकून सीट बुक करता. सगळ्यांचीच धावपळ. अरे मेल्यानु ! "बायल माणसांका वायच चढाक दिया रे ", इती कन्डक्टर. दोन - चार बायल माणसांनी तितकोच चान्स घेतलो आणि "चल गो बिगीबिगी", असा म्हणान काख्येतल्याक आणि हातातल्याक  पोरांका कसा-बसा वर चढवल्यानी.
गाडयेत चढताना थार नाय आणि चढले का शिट मिलवची गडबड.

 "गे, मी थय रुमाल टाकुन जागा अडवल्य गे", रमलो आरामात चढानं इलो रुमालाच्या भरवश्यार. गर्देत रुमाल काय आणि पिशी काय , कोण इचारता? झाली वादावादी सुरु. मालग्याची आवस वायच करवादानच बोल्ली "हय रुमाल बिमाल कायव दिसना नाय. आमका जागा गावली आम्ही बसलो.  वायच सरकान घेतो थय बस कोपऱ्यार", मरांदे खिडकी नाय तर नाय वाय टेकाक मिळाला तरी खूप झाला. रमल्याक तिसरी शीट कशीबशी गावली.
        एक - एक स्टॉप घेयत गाडी फुडे जाय तशी तशी माणसांची गर्दी वाढतच जाय. शिवाय प्रत्येकाचा ढीग भर सामान . कोण वर ठेवता तर कोण शिट खाली ठेवता. माणसांका उभ्या रवाक मिळतांना मारामारी.
कन्डक्टरनी घंटी वाजवन "भटवाडी" असा म्हटल्यान का ही माणसा उठतली. मग पुढे येतली. तो पर्यंत बाकीच्यांचो हाल. "अरे आधीच पुढे येवा रे! किती येळ लावतात उतराक; चल. पुढे चला ,चला. तिकीट कोणाचा रवला काय? बोला पुढे बोला , कोणी खाली उतरणाऱ्यानी पटकन पुढे येवन रवा . न उतरणाऱ्यानी वायच मागे सरका ,चला पाठी गाडी खाली असा. तेची आपली सततची टकळी चालू.
गे आजये! अगे काय घर इल्यार उतारतलय?अगे उतर मगे. इति कन्डक्टर.
"रे मेल्या होयsss उठाक नको? ह्या बघ कसा पायात मळणी घालता हाssss. नातीचा चप्पल पायातसून धापू झाला म्हणान ता पोरग्या आजयेच्या पायाखाली शोधी होता.

आजयेक उठाकव जमा नाय, बाजूक बसलेल्या भल्या माणसानं मदत केल्यानं आणि शिट खाली गेलेली चप्पल शोधून दिल्यानं तेव्हा आजी आणि नात खाली उतारली.
मरणाचा उकडता तेच्यात ही गर्दी.

कधी एकदा आपला ठिकाण येता असा प्रत्येकाक वाटत होता.
आता सारखे तेवा पावलो- पावली रिक्शा नाय होते. दिवसातसून एक एशटी सूटा. ती चुकली तर दुसरो पर्याय कायच नाय. नाय म्हणाक काका गवळ्याची एक गाडी होती. तो त्या गाडयेतसून माशे न्हेय (.त्या गाडयेतसून  गाबत्या (मासेवाली) जायत.)  गाडयेत माश्याच्या वासाबरोबर प्रवास करुचो लागा. गाडी चुकली का ह्यो एकच पर्याय होतो. ता पन बसाक मिळत असा नाय. कसा बसा वाकान दुडान ,गर्दीत आपले सगळे अवयव सांभाळत प्रवास करुचो लागा. घाण वासानं उलटी सारख्या जाय. पोटात ढवळान येय. पण करतस काय?
घराकडे पोचाक व्हया तर सगळा सहन करुक व्हया. आताच्या पोरग्यांक सांगूनच खरा वाटाचा नाय. आता एशटीकडे कोनी बघनत नाय. जो तो रिक्शानं प्रवास करता. चार पैसे गेले तरी चलात पण आरामदायी प्रवास. नायतर चाकरमानी आपली हक्काची गाडीच गावात आणतत.
अगदी "एशीत" ऐटीत बसान प्रवास करतत. गाडयेचे काचाव खाली करू नको. आणि तेव्हा एशटीच्या खिडकेतसून हवाय लागा नाय.

पण तेव्हा प्रवासातले सहप्रवासीपण आपलेशे वातट. गावातले प्रत्येक जन एक मेकाक  सांभाळून घेयत. त्या एशटीच्या प्रवासाची मज्जाच काय निराळी होती. ती मज्जा एशीच्या गाडयेत सुध्दा नाय.
एशटीचो प्रवास तो एशटीचो प्रवास. आता फक्त आठवणींतलो. मुंबईत कधी  एशटी दिसली का माका माझ्या माहेरचा माणूस भेटल्याचो आनंद होता. तिका मी डोळे भरान बघतय अगदी दिसेनाशी होय पर्यंत.

आवस -आई 
रवला -राहिले 
मळणी घालणे - घुटमळणे 
गाबत्या - कोळी , मासेवाला

Thursday 9 June 2016

वाशाडी मामा



नावं जरी इचित्र वाटला तरी आम्ही तेंका वाशाडीमामाच म्हणत होतो. ते सदान कदा ‘वाशाडी पडो व्हरान’ असाच म्हणत.

७०रीच्या आसपास, अंगान सडपातळ. आंगार कळकट-मळकट धोतार, कपाळावर फाटको पंचो गुंडाळलेलो, हातात काठी (तेचो उपयोग होयो तसो करुक गावता, कधी झाडावरची फळा काडुक, तर कधी पायाखालचा जनावर मारुक) असो तेंचो पेहेराव.

चिलिम ओढूची तेंका सवय होती. ते चिलिम ओढूक लागले का आम्ही सगळी चिल्ली-पिल्ली तेंच्या भोवती घोळको करून बघत असाव. ते चिलिम ओढूक लागले का घुड घुड आवाज येय, तेची आमका लय मजा वाटा.

आम्ही न्हान असल्याकारणात त्यांची जास्त माहिती आमका नाय. ते खयचे? त्यांचे नातेवाईक कोण? आमका कायच म्हायत नाय. आमच्याकडे ते सगळ्या कामाक होते. घराची साफसफाईपासून ते ढोरांची राखणीकरीपर्यंत, कधीतरी काय व्हाया नको ते आणणा, बागात पाणी लावणा सगळा ते बघत. सगळी कामा ते आपलीच समजान करीत. बरेच वर्षा ते आमच्याकडे होते.

आमच्या लहानपणी घरात राबतो खूप होतो. येणाऱ्या-जाणार्यांची खळतीच नाय. तेव्हा याकच हॉस्पिटल होतो. लोका गाव-गावातसुन(लांबासून) औषध उपचारासाठी वेंगुर्ल्यात येत. पेशंट हॉस्पिटलात आणि त्याचं सोबती आमच्याकडे. लांबची आणि बरेच दिवस ऱ्हवनारी असली तर तेंची जेवणा खाण्याची सोय मग व्हायनार व्हय. तेंका एक स्टोव्ह ,थोडी भांडी देवाची लागत. थोड्या दिवसा साठी असलो तर घरचाच जेवान.

अशी माणसा इली की मामांच्या कपाळावर आटयो पडत. जसो काय मीच ह्या घरचो करतो-सावरतो आसय अशा रुबाबात ते वावरत. वाशाडी रे पडो असो सूर लायत.

आम्ही सगळी पोरा टोरा रात्री झोपताना मामांका गोष्टी सांगूक लाव. तेंच्ये गोष्टी म्हणजे भूता-खेतांचे जास्ती. ते गोष्टी अगदी रंगवत सांगित. भुताची गोष्ट सांगूक लागले का आम्ही अगदी घोळको करून बसाव. मधी बसण्यासाठी प्रयत्न करू, कारण सगळीच भूताक भिया होती. भूतान माका धरल्यान तर......गोष्ट संपली कि सगळ्यांका एक नंबरसाठी जावक तर व्हयाच पण खळ्यात जावची भीती. तेव्हा न्हाणीघर नाय,त्यामुळे भायरच जावन बसाचा लागा. एकटा जावचा धाडस कोणाकडेच नाय. मग सगळे मिळान एकमेकांच्या सोबतीत व्हायर जाव. मान खाली घालून भीत भीतच कार्यभाग आटपून पटकन घरात येव. मामा आमच्या सोबत येयत. तोंडात देवाचा नाव घेवन पटापट सगळी पोरा आपापल्या अंथरुणात कपाळावर पांघरून घेवन गप गुमान झोपाक जाव, झोपाक सुद्धा मधी जागा शोधून झोपाचो प्रयत्न करू.

एकदा तर मामांनी आमच्याच आमच्याच बागातली घडलेली भुताची गोष्ट सांगीतल्यांनी.

गावात प्रत्येकाची(बहुदा) माडाची-पोफळीची बाग आसता. तेका पाणी लावायचा असता. गावात पाटाचा पाणी मे महिन्यात सोडतत, तर प्रत्येकानं बांध फोडून आपल्या बागात घेवचा असता. रात्रीच्या येळाक नायतर फाटेक पाणी इला तर ता घेवन बागात सोडूचा असता, ह्या काम मामाच करीत. हातात कंदील आणि काठी घेवन ते एक-एक बांध फोडून पाणी लाय होते. तितक्यात बागाच्या दुसऱ्या टोकाक ओहोळा कडसून दोन बायका येताना मामांका दिसल्यो. मामांचे पाय लटपटाक लागले. तेनी कंदील खाली ठेवलेलो तो घेवक ते पुढे गेले पण त्यांच्यातल्या एका बाईने तो कंदील उचाल्यान, मामांची पाचावर धारण बसली, ते गाळी घालूक लागले. मधीच देवाचा नाव घेयत. देवांका भूता भियातात असा लोक म्हणतत. तेंची चापलाव बाजूक काडून ठेवलेली तीव खय नायशी झाली. थोड्या वेळान कंदील लांब लांब जावक लागलो. ते इतके भियाले कि पाटाच्या पाणी लावणा अर्धवट सोडून ते घराकडे इले. भियाल्यामुळे आणि थंडीमुळे तेंका हुडहुडी भरली आणि तापव इलो .

दुसऱ्या दिसाक चपला एक आमच्या बागात तर दुसरा ओहोळाच्या पलीकडे अशी मिळाली. कंदील बागात पडलेलो गावलो.असा सगळा त्येनी आमका सांगल्यावर  आम्ही आमच्याच बागात आठ दिवसतरी फिरकाक नाय. दिवसा-ढवल्यापण भीती वाटाक लागली.

असे हे आमचे वाशाडी मामा बरेच वर्षा आमच्याकडे होते. नंतर माका वाटता शीक पडले म्हणान ते गेले असतील पुढे त्यांचा काय झाला काय कळाक नाय. तो काळ असो होतो, मोठ्यांका प्रश्न काय इचारतलय? त्वांड वर करून बोलाची सोय त्या येळाक नाय होती.

तर असे हे माझ्या स्मरणातले ‘वाशाडीमामा’.