Wednesday 15 April 2015

वाडवाळ ( राखणो )


वाडवाळ ( राखणो )

सकाळ पासून बबन्याची लगीन घाई चलली हा… आज काय आसा समजना नाय…

" रे बबन्या मेल्या काय शोधतय… ? कसली रे धावपळ तुझी ? "
आबान गडग्याच्या पैल्याडसूनच कुकारो घातल्यान…
" मेल्या कोम्बो खय गावना नाय. " बबन्याची भिरभिरती नजर वायाच आबार स्थिरावली.
" घरातल्यांका सांगलय पांजये खालचो कोम्बो सोडू नको. सगळ्याच कोंबड्यान्का सोडून घातल्यानी, आता हेका खय शोदू… ?"

आता आबाच्या लक्षात इला आज बबन्याकडे वाडवाळ आसा. आबाचो प्रश्न.
" वाडवाळ काय रे ? “ 
" होय, मग येतंय सांगाक " असा म्हणान बबनो कोंब्याच्या शोधात गेलो.

आजून बरीच कामा पडलीत...
घाड्याक आमंत्रण देवूचां आसा….
वाड्यात सगळ्यांका सांगुचा आसा….
बाजारात जावचा आसा….

आज काय बबन्याचो पाय जमिनीवर थारावना नाय…

" गोssss श्यामल्या, त्या कोयत्याक धार काढून ठेव गो… मी वायच बाजारात जावन येतंय…
पत्रावळी घरात किती ते बघ गो… द्रोणव असतले बघ… भजनाक आणलेले ते…
खुटयेक पिशी लावलेली आसा बघ…
काय काय आणुचा ता एकदाच सांग. 
माका परत परत जावक नको…
न्हिमार मेला असा लागता हाssss आणि वायच जरा पाणी खावक आण गो…”

सकाळ पासून पाणी घोटूक बबन्याक फुरसत नाय…

वर्षातसून येकदा घराच्या मागच्या बाजुक राखणो देवचो आसता.
वर्षभर आपल्या घराचो आणि कुटुंबियांचो राखण केल्या बद्दल ह्यो राखणो देवचो आसता.
हेका कोणी वाडवाळ म्हणतत तर कोणी राखण म्हणतत…
संध्याकाळी गावचो घाडी येवन गार्हाणा घालता आणि कोम्बो देता.
चिर्याचे मोठे चुली घालून जेवण करतंत…

बबन्यान गण्याक वायच मदतिक घेतल्यान. तेनी पत्यारो येकठय करून आग लावल्यान आणि जेवणावळ बसाची जागा साफ करून घेतल्यान… 
येक बल्ब आणून लाईट जोडल्यान… (पूर्वी ग्यास बत्ती पेटवत.)
मोठे टोप घासून तेका थामान मारून ठेवल्यान… ( थामान कुणी मातयेचा मारतत तर कोणी रखयेचा मारतत ) कामा काय थोडी असतत...
संध्याकाळी घाडी इले… तेनी मागच्या पोरसात नजर फिरयल्यान.
सगळी तयारी बबन्यान व्यवस्थित केलेली दिसली.
घरातले सगळे जाणकार इले घरातलो करतो पुरुष पुढे सरलो.
घाड्यान पानपाकळी कोम्बो मानवल्यान… आणि गार्हाण्याक सुरुवात केल्यान…

" बारा गावच्या बारा येशीच्या… बा देवा लिंगेश्वरा,गांगेश्वरा, गावदेवी माउली, अंगाणेवाडची भराड़ी तसेच पिपळाखालच्या, चिचेबुडल्या देशापरदेशात गेलल्या सगळ्यांका रे महाराजा… व्हय महाराजाssss…
आता पर्यंत जसा तू या घराचो राखण करीत इलय… तसोच जागरूक रवान घरावर… पोरा बाळांवर… लक्ष ठेव रे महाराजा…. व्हय महाराजाssss "

सगळ्यांनी तेका जोरात साथ दिली… घाडयान फक्कड असा गार्हाणा घातल्यान…
चूल रणरण पेटवन तेचार आदाण ठेवल्यान… आणि कोम्बो सुटी केल्यान…
भात-सागोती तयार जाय पर्यंत गावचे सगळे एक एक करून येवक लागले…
चोपाळ्यार पानाची तबकडी ठेयलेलीच होती…
जो तो येय आणि व्होया तसा पान तयार करून घेय…
पानान तोंड रंगला तसा गजालिकव रंग चढलो…
घाड्याचा जेवण तयार झाला तशे पंगती वाडुक सुरुवात झाली…

ह्या कामाक बायल माणसांका घेनत नाय… तेव्हा सगळा काम बापयेच करतत…

सगळे पोटभर जेवले मा ?
बबन्यान सगळीकडे एकदा नजर टाकल्यान,
कोणी चुकलो माकलो रवलो काय ?
मग बाकीचे बापये जेवक बसले…

बबन्याच्या घरचो वाडवळाचो कार्यक्रम व्यवस्थित पार पडलो…
सगळे तृप्तीचे ढेकर देवन आपापल्या घराक जावक गेले…

बबनो मागचा पुढचा काम आटपून घरात इलो…
येक काळजी पार पडली… 

बाईल पाणी हाणून दिता…
अगो म्हागाइच्या दिसांत लय भारी काम जाता गो… 
देवान आपला व्यवस्थित करून घेतल्यान… देवाक काळजी… दुसरा काय !

अहो खेका काळजी करतात…? तो सगळा करून घेणारो आसा.  आपणाक जमता तसा करुक व्होया… काय काळजी करू नको… 

व्हय गो तोच करून घेतोलो…
देवापुढे नतमस्तक होवन बबन्या म्हणता… 
"असाच सालाबाद परमाना तुझी सेवा माझ्याच्यान  होव दे रे म्हाराजा ! "  

त्येनी हात जोडल्यान नतमस्तक होवन नकळतच त्याच्या तोंडात शब्द ईले...

" असोच लक्ष ठेव रे म्हाराजा !!! "


कुकारो             =     आवाज दिला
गावना नाय      =     मिळत नाय
पांज                =     कोंबड्यांना झाकायची टोपली
पत्यारो            =     झाडाची वाळलेली खाली पडलेली पानं
येकठय             =     जवळ करणे,  गोळा करणे
थामान            =     ओली माती किंवा राख पातेली च्या मागे लावणे
पोरसात          =     परिसर
सुटी केल्यान     =     साफ केल्यान