Friday 30 October 2015

संकष्टी नि चिचेबुडलो गणो


संकष्टी नि चिचेबुडलो गणो 




                                     

"आये चिचेबुडलो गणो इलो हा "

आयेक आरडान मी सांगलय आनि खळ्यात खेळाक मी गेलय.
गणो येवन रोजच्यासारखो खाली मान घालून गहन प्रश्नात असल्या सारखो वसरेक टेकान बसलो. शून्यात नजर ठेवन तो कसलो विचार करीत असता समाजना नाय. बघुचो तेव्हा तो कसल्याशा विचारांत  असता .

अंगात जुनो शर्ट, बरेच दिस तेका पाणी लागला नसात असा. साधारण पन्नाशीचो, सडपातळ कष्टान नियमित थकलेलो गणो सगळ्या गावचोच गणो होतो. कोणाचाव अडी - अडचणीक गणो धावान जाय.

आयेन पतेलेतसुन गरम पेज आणि रातची भाजी त्येका आणून दिल्यान. गण्याची तंद्री भंग झाली. आयेकडे कटाक्ष टाकून समाधानाचा हसणा तेच्या थकलेल्या तोंडावर दिसला. पातेला तोंडाक लावन तेनी गरम गरम निवळ घोटल्यान. भाजी पेज चवी- चवीन सावकाश खाल्यांन. तृप्तीचो ढेकर देवन तो उठलो.  पातेला घासून न्हानयेकडे उपडी घातल्यान आणि "येतंय गे " , असा म्हणान पुढच्या कामाक गणो गेलो.

भूक लागली का गणो कधीय येय होतो. त्या येळेक काय तयार असात ता आये पुढे करी. गण्याक म्हायत होता ही माऊली माका उपाशी पाठवची नाय. सणा वाराक आये तेका जेवक बोलय. घरात कायव गोडा धोडाचा आयेन केल्यान का तेच्यात गण्याचो वाटो असतोलोच.

येकदा आयेन माका सांगलेला आठवता, गण्याचा घर थय भटवाडीक चिचेखाली होता. घरची खूप गरिबी. तो धा-बारा वर्षाचो आसताना तेचि आवस शिक पडली. गावात डाकटर पन तेव्हा जास्त नाय होते. असले तरी कनवटीक पैसो व्हयो उपचार करुक. बरेच दिस हातरुनाक खिळान होती. पोरात जीव अडकान होतो असा लोका म्हणत. मग काळापुढे तिचाव काय चलाक नाय. गेली सोडून गण्याक.

बापूस हय-थय हिंडान कामा करी. कसा बसा दोघांचा पॉट भरा. बापाशी बरोबर गण्याव आता हातभार लावक शिकलो. गरिबीन आणि परिस्थितीन गण्याक शाळेची पायरी काय चढाक मिळाक नाय.  तेका आवाडय नाय. बापाच्या पश्यात गणो गावचो गडी झालो. कोणाक व्हया तसा राबन लोका घेवक लागली. कोणी खावक-जेवक घालीत तर कोणी पैशे देयत. गरीब स्वभावाचो गणो सांगला काम करी. कधी कोणाक नाय म्हणान नाय.

आयेविणा पोर म्हणान आमच्या आयेक तेची दया येय. आमचाव बागाची देखभाल गणोच करी. मांगरात गवताचे भारे ठेवना ही कामा गणो न सांगता करी. "गे ! पावसाळो जवळ इलो हा, लाकडा भरून ठेवक होईत ", असो गण्याचो घोको आधीच चालू जाय. कामा पार पडापर्यंत गण्याक थारो नाय.

" आज संकष्टी आसा, रात्री जेवकच येरे मोदक करतय . "

 आयेन गण्याक सांगल्यान हातातल काम न थांबवताच खाली मान घालून "व्हय " असा गण्यान म्हटल्यान.

न्हिमार वर इला  तसा आयेन  दिलेला घास- मुटला खावन गणो रमल्याच्या शेतार कामाक  गेलो. जाताना "रातचाक येतय गे ," असा सांगान गेलो.

लवकर लवकर कामा आटपाक व्होई म्हणान गणो बेगीन  बेगीन हात चालय होतो तितक्यात गवतातलो साप गण्याक डसलो . ढिगाऱ्या खालचो साप गण्याच्या नजरेक पडाक नाय. गणो आरडाक लागलो. भियान तेचा पाणी-पाणी झाला. जवळची लोका धावान इली. कसलो साप होतो कोणाकव कळाक नाय. साप कोणाक दिसाकच नाय. हास्पीटलात नेल्यानी. गावात सगळीकडे बातमी पसारली. गावात सगळ्यांका दुःख झाला. आयेक समाजल्या बरोबर आयेन हास्पीटलात धाव घेतली. गण्याकडे बघवत नाय व्होता. गणो निपचित पडान व्होतो. डाकटरांनी कसलासा इन्जक्शन दिल्यानी होतो.

आयेन गण्याच्या कपाळार, छातीर हळूवार हात फिरवल्यान. गण्यान मोठया कष्टान डोळे उघडल्यान. तेका बोलाक जमा ना. आयेकडे नुसता भरल्या डोळ्यान तेनी बघल्यान. बरा वाटाल तुका... असो दिलासो आयेन तेका दिलो. जड पावलानी आये कशी-बशी घराकडे इली. तिच्या लक्षात इला गण्याक मोदक लय आवडतत. आज जेवकय गण्याक बोलावलेला. आयेन डब्यात चार मोदक भरल्यान आणि परत इल्या पावलान तशीच हास्पीटलात गेली.

आता तर गण्या काळो-निळो  दिसाक लागलो. तेच्यात डोळे उघडूकव त्राण नाय हृवाक. आयेन मोदक तोडुन बारीक तुकडो गण्याच्या तोंडात घातल्यान. आयेचो हात थरथराक लागलो . गण्यान मोठ्या कष्टान तो घास खाल्यान.  आयो हुंदाको आवारीतच ब्हायर  इली .

त्याच रात्री गणो सगळ्या गावाक सोडून गेलो. त्येच्या मागे रडणारा असा कोणी नाय व्हता.   पण आख्खो गाव मात्र हळहळलो.

तेव्हा पासून दर संकष्टीक आये पानावर कावल्याक मोदक ठ्येय . अगदी न चुकता. आयेचा आणि गण्याचा काय नाता होता ?

आज मी पन्नाशी पार केलय पण ह्यो चिचयो बुडलो गणो विस्मरणात जावक नाय. आजुनय संकष्टीक मोदक केल्या काय आये बरोबर गण्याचीच आठवण येता.


चिचयो बुडलो - चिंचेच्या झाडा खालचा.
वसरेक -ओसरी
कनवरीक - हाता जवळ ( हातात )
मांगर - गोठा
घास -मुटला - खाणं ( किंवा जेवण)
रातचाक - रात्री
भियान -घाबरून
निपचीत -शांत